राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र जळतोय, आंदोलक आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “विरोधी पक्षात असताना फडणवीसांनी म्हटलं होतं की, ‘सत्तेत आल्यास मराठ्यांना आरक्षण देणार. आरक्षण नाही दिलं, तर राजकीय संन्यास घेईन.’ पण, सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन आहे.”
हेही वाचा : “मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? त्यांचा…”, बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल; म्हणाले…
“महाराष्ट्र जळतोय, मराठा आंदोलक आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाके पडल्यासारखं दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी सरकारची प्रामाणिक इच्छा नाही,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.
हेही वाचा : “मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर मंत्रिमंडळ प्रस्ताव करून विधानसभेत मंजूर करावा. नंतर केंद्र सरकारनं घटनेत बदल करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावं,” अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.