राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसं सूचवलं आहे. जंयत पाटील नुकतेच जळगाव दौऱ्यावर येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावात आयोजित केलेल्या एका सभेत बोलताना जयंत पाटील एकनाथ खडसे यांना म्हणाले, रावेर लोकसभेचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा. दरम्यान, एकनाथ खडसे यांनीदेखील यास अनुकूलता दर्शवली आहे. विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले, मी लोकसभा लढवण्यास फार उत्सूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन.
एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात केलेल्या भाषणात मला म्हणाले रावेर लोकसभा क्षेत्राचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा अशी आमची इच्छा आहे. खरंतर ही लोकसभा आजवर काँग्रेस लढवत आली आहे. १९८९ साली हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण १० निवडणुका झाल्या. या १० पैकी नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. केवळ एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली. काँग्रेसने केवळ १३ महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता.
हे ही वाचा >> ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”
एकनाथ खडसे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले काँग्रेसचा रावेरमध्ये नऊ वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी आता बदल करावा आणि आम्हाला ही जागा द्यावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अजून याबाबत निर्णय व्हायचा आहे. निर्णय झाला तर तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षाच्या सूचनेचा नक्कीच विचार करेन.