भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत माघार घेतली. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर भाजपाच्या या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता भाजपाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (१८ ऑक्टोबर) मुंबईत बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली. भाजपाने माघार घेण्याचं कारण काहीही असलं तरी प्रथम दर्शनी असं वाटतं की, भाजपाला पराभवाची भीती होती. भाजपाने आधीपासून ठरवलं होतं की ही निवडणूक लढवावी.”
“तुम्हाला माघारच घ्यायची होती, तर शिंदे गटाला उमेदवारी दिली असती. त्यावेळी शिंदे गट की ठाकरे गट कोण प्रभावी आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं,” असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपाला टोला लगावला.
पोलिसांकडून जळगाव सहकारी दुध संघात १ कोटी १५ लाखांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी दुध संघ येथील १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे १४ मेट्रिक टन लोणी व ९ टन दुध पावडर चोरी आणि अपहाराची गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही. अखेर खडसेंसह दुध संघाचे संचालकांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.