राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिवंगत ज्येष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर त्यांनी या राज्याची राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. ते जळगावमध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसे म्हणाले, “गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रभर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते उभे केले. धनंजय मुंडे यांच्यासारखा एक युवा कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वात तयार झाला. आमची धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षा आहे की गोपीनाथ मुंडे यांनी जी शिकवण दिलीय त्यांचा तो राजकीय वारसा महाराष्ट्रात असाच उच्चांकी पातळीवर न्यावा. त्या समाजाचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रात करत रहावं.”

“गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात असते तर त्यांनी मुख्यमंत्रीपद बदललं असतं”

“गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात असते, तर त्यांनी या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ५-७ वर्षात जे अनुभवलं तो प्रकार झाला नसता. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राज्याची आणखी भरभराट झाली असती. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे आम्हाला अचानक सोडून गेले,” असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

“जेव्हा फडणवीस पाचव्या टेबलवर बसायचे…”

दरम्यान खडसे आणि फडणवीस यांच्यातील वाद जगजाहीर आहे. याआधी एकनाथ खडसे म्हणाले होते, “जेव्हा विधानमंडळात फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेतली.”

हेही वाचा : “पोरीबाळींच्या मागे लागून कुणी…”, गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंची खोचक टीका; ‘नौटंकी’ म्हणून केला उल्लेख!

“फडणवीसांच्या आशीर्वादानेच मला…”

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांचं स्वागतच केलं. पण देवेंद्र फडणवीसांनी माझ्या चौकशा करणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करणं, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणं, दाऊदच्या बायकोशी माझं संभाषण दाखवणं, माझ्या पीएनं लाच घेतली, मी भूखंडात गैरव्यवहार केला असे खोटे आरोप केले. माझं तिकीट कापलं गेलं, माझी ईडीनं चौकशी केली अशा प्रकारे मला वारंवार छळण्याचा प्रकार यांच्या आशीर्वादाने झालेला दिसतोय”, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse comment on current maharashtra politics and mention gopinath munde pbs