राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात असताना त्यांचा कसा छळ झाला याबाबत गंभीर आरोप केलेत. “माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी यांच्या मागे चौकशी लावली. सगळं कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसतं. मी काय गुन्हा केलाय?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे आमदार एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली, नाही तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता. मी प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जमिनीचे आरोप झाले. इतकं छळलंय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही. मात्र, राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलंय. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होतं. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला.”
“सगळं कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसतं”
“माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी यांच्या मागे चौकशी लावली. सगळं कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसतं. मी काय गुन्हा केलाय? कुठे पैसे खाल्ले? काय घेतलं तुम्ही दाखवा ना?” असा भावनिक सवाल एकनाथ खडसे यांनी केला. “मला अनेकांना छळता आलं असतं. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते,” असंही खडसेंनी नमूद केलं.
पाहा व्हिडीओ –
“गेल्या ४० वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं”
सध्याच्या राजकारणाबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असं वरवर वाटत असलं तरी, या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळं घडतंय हे म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल. गेल्या ४० वर्षात असं राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचं वातावरण आहे.”
“कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही”
“कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलंय. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेन अशी स्थिती आहे. यामध्ये असं चित्र दिसतंय की, एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्या निर्णयनुसार या तांत्रिक बाबींची सोडवणूक झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघणार नाही,” असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.