शेतकऱयांना कर्जमाफी देऊन गेल्या सरकारने राज्याला कर्जबाजारी करून ठेवले आहे. त्यांनी केलेली घाण साफ करण्याचे काम आम्ही करतो आहोत. त्यामुळे आता मदत द्यायला वेळ लागत आहे, असे उत्तर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये दिल्यावर विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
शेतकऱयांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यावर गोंधळ घातला. त्यामुळे सुरुवातीला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या मागणीला उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांना चर्चा करायची नसून, नुसता गोंधळ घालायचा आहे. गेल्या सरकारने शेतकऱयांना दिलेल्या कर्जमाफीचा कोणताही लाभ मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱयांना झाला नाही. केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांनाच याचा लाभ झाला. कर्जमाफी देऊन गेल्या सरकारने राज्याला कर्जबाजारी करून ठेवले आहे. आता ही घाण साफ करायचे काम आम्ही करतो आहोत. त्यामुळेच मदत देण्यासाठी वेळ लागतो आहे. शेतकऱय़ांना मदत देण्यास सरकार तयार आहे. त्यावर चर्चा करण्यासही तयार आहे. चर्चेने प्रश्न सुटतात. मात्र, विरोधकांना नुसता गोंधळ घालायचा आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. त्यांच्या या उत्तरावर विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा वेलमध्ये उतरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालिका सभापती जनार्दन चांदूरकर यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2015 रोजी प्रकाशित
गेल्या सरकारने केलेली घाण आम्ही साफ करतोय – एकनाथ खडसेंच्या उत्तराने विरोधक संतप्त
शेतकऱयांना कर्जमाफी देऊन गेल्या सरकारने राज्याला कर्जबाजारी करून ठेवले आहे. त्यांनी केलेली घाण साफ करण्याचे काम आम्ही करतो आहोत....
First published on: 14-07-2015 at 12:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse critcized last congress ncp alliance govt over debt on maharashtra