राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच चव्हाण यांनी इतरांच्या जमिनी हडप करत चोऱ्या आणि लबाड्या केल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी त्यांनी सुरेश जैन यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारांवरही भाष्य केलं. एकनाथ खडसे जळगावमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “तुम्ही दोन वर्षांपासून नाथाभाऊ तुरुंगात जाण्याची वाट पाहत आहात, पण तुम्ही माझी काळजी करू नका. मी बाहेरच राहणार आहे. मी काहीही केलं नाही. मी तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाहीत आणि लबाड्याही केल्या नाहीत. कोणाच्याही जमिनी हडप केल्या नाहीत. तुमचे सुरेश दादांचे व्यवहार झाले आहेत तेही मला माहिती आहेत.
“तू नाथाभाऊंशी काय बोलणार, ‘कल का छोकरा है'”
“कुणाबरोबर साखर कारखान्याचे व्यवहार झाले तेही मला माहिती आहेत. याच्या सर्व तक्रारी ईडीकडे केल्या. मात्र, त्या तक्रारी कशा दाबल्या याचीही मला पूर्ण कल्पना आहे. तू नाथाभाऊंशी काय बोलणार, ‘कल का छोकरा है’, तुझं जितकं वय नाही, तितकं नाथाभाऊंचं राजकारणातलं वय आहे,” असं म्हणत खडसेंनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली.
व्हिडीओ पाहा :
“जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते”
एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्हा पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “कोणत्याही गुन्ह्या संदर्भात फिर्याद घ्यावीच लागते. कोणत्या नियमानुसार पोलीस फिर्याद नाकारू शकतात? फिर्याद नाकारायची काय गरज आहे?”
हेही वाचा : “…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”, गिरीश महाजनांचं वक्तव्य
“…त्यावेळी मला पोलीस अधीक्षकांबाबत खरं समजलं”
“आश्चर्याची बाब आहे की, जळगाव पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्याची पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते. पोलीस निरीक्षक आतापर्यंत चांगले काम करत होते, असं माझं मत होतं. मात्र, बकालेची यादी माझाकडे आली त्यावेळी मला पोलीस अधीक्षकांबाबत खरं समजलं,” असा गंभीर आरोप खडसेंनी केला.