जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी काल माध्यमांशी बोलताना दिले होते. दूध संघाच्या माजी सदस्यांनी अद्याप पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
हेही वाचा – “आम्हाला मुका मार देता येतो, तुम्ही…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर टोला!
काय म्हणाले एकनाथ खडसे?
“गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. रात्री-बे-रात्री, उठता-बसता त्यांना फक्त एकनाथ खडसेच दिसतात. जळगाव जिल्हा दूध संघामध्ये गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची तक्रार मी स्वत: केली होती. मात्र, राजकीय दबावामुळे माझ्या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. माझ्या तक्रारीवरून जर गुन्हा दाखल झाला, तर आर्थिक गैरव्यवहार नेमका कोणी केला, हे स्पष्ट होईल”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
हेही वाचा – ‘सावरकर गौरव यात्रे’वरून खासदार अमोल कोल्हेंचं भाजपा-शिंदे गटावर टीकास्र; म्हणाले, “अशी यात्रा काढल्याने…”
“मुळात या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. कदाचित थोडीफार अनियमितता असू शकते आणि ज्यांनी ही अनियमितता केली, त्यांना शिक्षा होईल. पण सत्तेचा माज आल्याने विरोधकांवर खोट गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे”, असेही ते म्हणाले.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले होते?
मंगळवारी जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिवसेना शिंदे बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीक केली होती. जळगाव जिल्हा दूध संघात साडेपाच कोटींचा घोटाला झाला असून ही गंभीर बाब आहे. आज जिल्हा दूध संघात झालेल्या बैठकीत जिल्हा दूध संघांचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी संबंधित आजी आणि माजी सदस्यांना पैसे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पैसे न भरल्यास नाईलाजास्तव दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार आहे, असं ते म्हणाले होते.