भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खडसे यांनी माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा यापूर्वीच केलेला आहे. दरम्यान खडसे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र ते अद्याप रामराज्य आणू शकले नाहीत, असे खडसे म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. ते विजय मिळवून परत आले होते. एकीकडे श्रीरामाने आज विजय संपादन केला होता. दुसरीकडे महाराष्ट्रातही शिंदे यांनी विजय संपादन केला आहे. मात्र श्रीराम यांनी जे रामराज्य आणले होते, ते रामराज आणण्यात शिंदे सरकार कमी पडत आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून भीषण चित्र निर्माण झाले आहे. या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने उचांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे. शिंदे सरकार आश्वसन देत आहे. मात्र कृतीत काहीही उतर नसल्याचे दिसत आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन…”, सरकार बडतर्फ करण्याबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका!

दरवर्षी दिवाळी येते. हा सण आपण उत्साहाने साजरा करतो. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. महागाईचे चटके जाणवत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील आहे, अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा >>> Britain PM Rishi Sunak: जावई ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “ऋषीचं अभिनंदन, आम्हाला…”

दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणी पुणे न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडलेली आहे. आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी यापूर्वी केला आहे.