भाजपाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मुलांबद्दल विधानं केली आहेत. दरम्यान, गिरीश महाजन यांनी ‘एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली,’ असे विधान केले आहे. त्यांच्या याच विधानानंतर खडसे भावूक झाले. त्यांनी महाजनांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांच्या या विधानामुळे आम्हा कुटुंबियांना वेदना होत आहेत. माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत रक्षा खडसे तसेच माझ्या कुटुंबावर आक्षेप घेतला जात आहे. महाजनांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या कुत्सित वृत्तीचे लक्षण आहे, असे खडसे म्हणाले आहेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मुलाची हत्या की आत्महत्या, बोलायला लावू नका”, महाजनांच्या इशाऱ्यानंतर खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“अत्यंत नीच आणि हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजन यांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर महाजन यांची मनोवृत्ती लक्षात येते. मी गिरीश महाजन यांच्या मुलाबाबतीत कधीही बोललो नाही. तुम्ही माझ्या घरात घराणेशाही आहे, असे म्हणता. तर मग तुमच्या घरात काय आहे? साधनाताई २७ वर्षांपासून सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, १५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहेत. तुम्हाला दुसरे कोणी मिळाले नाही का? तुम्हाला मुलगा असता तर सून आणि मुलगा असे दोघेही राजकारणात असते. मुलगा असता तर मी त्याला आशीर्वाद दिला असता, असे मी म्हणालो होतो. असे असताना निखिल भाऊची हत्या झाली की आत्महत्या, असे प्रश्न विचारणे चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

हेही वाचा >>> “घरात नाही पीठ आणि कशाला हवं…” आंबेडकर-ठाकरेंच्या संभाव्य युतीवरून अतुल भातखळकरांची खोचक टीका!

“निखिल भाऊंचा मृत्यू झाला तेव्हा मी तेथे नव्हतो. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी फक्त रक्षा खडसे होत्या. त्यामुळे महाजनांनी जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ रक्षा खडसे यांच्यावर संशय आहे, असा होतो. आमच्या परिवारावर त्यांनी संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आमच्या परिवाराला फार वेदना झाल्या. माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे. माझ्या मित्रपरिवारातून साधारण ६० ते ७० फोन आले आहेत. त्यांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा निषेध केला आहे,” अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> VIDEO: “…तर शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”, आमदार संजय गायकवाडांचा गंभीर इशारा

“गिरीश महाजन यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या कुत्सित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राजकीय द्वेषापोटी माणूस किती खाली जाऊ शकतो, हेच यातून दिसते. हा सत्तेचा माज आहे. सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीकादेखील खडसे यांनी केली.

नेमके प्रकरण काय?

हेही वाचा >>> राहुल यांच्या यात्रेमुळे राज्य काँग्रेसमधील मरगळ दूर, आता आव्हान यश मिळविण्याचे

शनिवारी ( १९ नोव्हेंबर ) राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याला २१ नोव्हेंबर रोजी गिरीश महाजन यांनी उत्तर दिले होते. “मला दोन मुली असून, त्यांना राजकारणात आणलेलं नाही. त्याचा मला आनंद आहे. मात्र, खडसेंना प्रश्न आहे, त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की हत्या झाली, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse criticizes girish mahajan over comments on nikhil khadse death prd