राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भेट नाकारल्याचे म्हटले जात असताना भाजापाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट घेत एकदा बसून सर्व मिटवून टाकुया अशी विचारणा केली होती, असे गिरिश महाजन म्हणाले आहेत. मात्र महाजनांचा हा दावा एकनाथ खडसे यांनी खोडून काढला असून मी गिरिश महाजन यांना तसे काहीही बोललो नसून देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता, असे खडसे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> “एकदा बसू, मिटवून टाका,” खडसेंनी फडणवीसांसोबत काय चर्चा केली? गिरिश महाजन यांनी केला मोठा दावा
नाशिकमध्ये महानुभाव पंथाचा एक मेळावा होता. या मेळाव्यात माझे भाषण झाले. या भाषणानंतर मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. मिटवून टाका वगैरे असे मी काहीही बोललो नाही. फडणवीसांनी मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात कळवतो, असे मला सांगितले. मिटवायचा वगैरे असा काही विषय नव्हता. आता मिटवायचं काहीही राहिलेलं नाही. ईडी, सीबीआय यांच्याकडून चौकशा सुरूच आहेत. जे सुरू आहे त्याच्याशी माझा लढा आहे. आता मिटवायचे काहीही राहिलेले नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.
अमित शाहांनी खडसे यांना भेट नाकारली, हा गिरिश महाजनांचा दावाही खडसे यांनी भेटाळून लावला. मी अमित शाहा यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि तेथे तीन तास थांबलो असे रक्षा खडसे यांनी मला सांगितले, असे गिरिश महाजन सांगत आहेत. मी रक्षा खडसे यांच्याशी याबाबत बोललो. मात्र रक्षा यांनी मी असे कोठेही बोललेले नाही. आम्ही अमित शाहा यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मात्र आमची त्यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे अमित शाहा आणि एकनाथ खडसे यांच्यात दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चा झाली असे मी त्यांना सांगितले, असे रक्षा खडसे यांनी मला सांगितलेले आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
हेही वाचा >> Shinde vs Thackeray: शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर, रंगणार नवा ‘सामना’, पण चिन्हाचं काय?
गिरीश महाजन यांनी काय दावा केला?
भाजपाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले होते. तेव्हा मिही तेथे होतो. ते म्हणाले की, एकदा आपण बसू. जाऊद्या मिटवून टाका. मात्र त्या भेटीच्या वेळी खूप गर्दी होती. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय होतं, हे समजू शकले नाही, असे गिरिश महाजन म्हणाले आहेत. गिरिश महाजन यांच्या या माहितीनंतर आता वेवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.