Eknath Khadse : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. सर्वच पक्षांचा मागील काही दिवसांपासून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांनीही राज्यातील विविध मतदारसंघात जाहीर प्रचारसभा घेतल्या आहेत. आज (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे काही नेत्यांकडून जनतेला भावनिक साद घातली जात असल्याचंही पाहायला मिळत आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे. तसेच आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली.

हेही वाचा : Mahadev Jankar : “मी मुख्यमंत्री कधीच होणार नाही, पण पाच मिनिटं तरी पंतप्रधान होईल”, महादेव जानकरांचा मोठा दावा

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे. आपणही मला सहकार्य केलं. तुमच्या सुख आणि दुःखात देखील मी सहभागी झालो. कोणताही धर्म आणि जात न पाहता मी आतापर्यंत मदत करण्याची भूमिका निभावली. पण तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक मी पाहील की नाही? हे इश्वरच ठरवेल. कारण पुढच्या निवडणुकीत मी असेन किंवा नसेन. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करतो की, रोहिणी खडसे या निवडणुकीत उभ्या आहेत. आपण मला जसं सहकार्य केलं तसं रोहिणी खडसे यांनाही सहकार्य करा, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी जनतेला घातली आहे.

एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. खरं तर राज्यात युती आणि आघाडीच्या राजकारण सुरु आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पहायला मिळणार असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा करत आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse emotional response to the public in jalgaon politics rohini khadse maharashtra vidhan sabha election 2024 gkt