तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले, भाजपामध्ये येण्याचा माझा प्रयत्न नव्हता. परंतु, भारतीय जनता पक्षातील जे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना ते म्हणायचे की तुम्ही आत्ता भाजपात असायला हवे होतात. तुम्ही स्वगृही परत आलात तर बरं होईल. गेल्या चार-सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा चालू होती. परंतु, माझ्या राजकीय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला मी दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून सध्या दबावतंत्राचं जाळं टाकलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील असाच आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले, एकनाथ खडसे अटकेच्या भितीने पुन्हा भाजपामध्ये परतले आहेत. या सर्व आरोपांवर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, माझी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा होती. भाजपात प्रवेश करणं मला नवीन नाही. मी गेल्या ४० वर्षांपासून भाजपासाठी काम करत आलोय. त्याच जोमाने भाजपाचं काम करावं म्हणून मी भाजपात जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून, त्यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून देशाच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपात जात आहे.

हे ही वाचा >> “आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी भाजपाला रामराम केला होता. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली होती. मात्र आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घ्यायचं ठरवलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse expresses why he is joining bjp asc