Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. आपला प्रचंड छळ केला असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी छळ केला म्हणून मी पक्ष सोडला असाही आरोप केला होता. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे ( Eknath Khadse ) सूर बदलले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही असं आता एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बहुमत आहे हे मान्य करावंच लागेल-खडसे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. बहुमत, जनमत त्यांच्या बाजूला आहे. देवेंद्र फडणवीस हे बहुमताने निवडून आले हे मान्यच करावं लागणार आहे. व्यक्तिगत मतभेद, टीका वगैरे असू शकते. त्याला फार महत्त्व न देता लोक ज्यांना निवडून देतात त्यांच्या बाजूला बहुमत असतं हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. आमचा पराभव झाला आहे, त्याची कारणं असू शकतात. पुढे काय घडेल? ते काळ ठरवेल. पण विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणं ही माझ्यावरची जबाबदारी आहे. असं एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) म्हणाले आहेत.

अजित पवार भाग्यवान आहेत-एकनाथ खडसे

अजित पवार भाग्यवान आहेत. त्यांच्यावर ७० हजार कोटींचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना क्लिन चिट मिळाली. महायुतीबरोबर जो जातो तो स्वच्छ होतो हे वास्तव आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- “भाजपामध्ये कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादीत….,” एकनाथ खडसे यांचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या दुश्मनी हा विषय नव्हता-खडसे

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत टोकाची भूमिका वगैरे व्यक्तिगत नव्हती. दुश्मनी वगैरे हा विषय नव्हता. राजकीयदृष्ट्या मी विरोधी पक्षात असताना मी विरोधी पक्षाची भूमिका मांडणार, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडणार. त्या माध्यमातून कधी कधी तणाव होतात. आजही अशी स्थिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात या वर्षभरात आता तणाव राहिलेला नाही. मी काय भारत-पाकिस्तानसारखा दुश्मन नाही की आमच्यात तणावच राहिल. आम्ही बोलतो, एकमेकांशी चर्चा करतो. मात्र विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायची असेल तर ती पार पाडतो. दिलजमाईचे वगैरे संकेत नाही. मी काही भांडलो होतो का? देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत कधीही वैर नव्हतं. माझे तात्विक मतभेद होते ते राहिले असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse imp statement about devendra fadnavis said we are not enemies on personal scj