गतीमान व हायटेक प्रशासनाचा भोंगळ कारभार
गैरव्यवहारांच्या झालेल्या आरोपांमुळे प्रचंड अडचणीत आलेले एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन २६ दिवस झाल्यावरही शासनाच्या संकेतस्थळावर अद्याप खडसेंचे छायाचित्र मंत्री म्हणूनच झळकत आहे. या प्रकारामुळे गतीमान व हायटेक असल्याचा गवगवा करणाऱ्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
एका पाठोपाठ एक गंभीर आरोपांच्या गर्तेत अडकलेले कृषी, महसूलसह एकूण १० खात्यांचे मंत्रिपद सांभाणाऱ्या एकनाथ खडसे यांनी ४ जूनला मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडील सर्व १० खात्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींना आता २६ दिवसांचा कालावधी झाला आहे, तरीही सरकारी यंत्रणा खडसे यांना अद्यापही मंत्रीच समजत असल्याचे समोर आले. रोजगार हमी योजना-नियोजन विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्र्यांसह मंत्री म्हणून खडसे यांचेही छायाचित्र झळकत आहे. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावरही त्यांचे छायाचित्र संकेतस्थळावरून काढायला सरकारी यंत्रणेला विसर पडल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गतीमान व हायटेक सरकार, अशी स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या राज्य सरकारवर या प्रकारामुळे नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आपले सरकार या वेबपोर्टलमुळे सरकारच्या विविध सेवांचा ऑनलाइन लाभ घेता येत आहे. आपले सरकार या वेबपोर्टलचा वापर संकेतस्थळाद्वारेही केला जाऊ शकतो. या संकेतस्थळावर ‘मागेल त्याला शेततळे’ योजनचा लाभ घेण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यावर रोजगार हमी योजना-नियोजन विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे संकेतस्थळ उघडते. त्या संकेतस्थळावर योजनांचा शासन निर्णय, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया, वैयक्तिक अर्जाचा नमुना, सामुदायिक अर्जाचा नमुना आदींचा समावेश आहे. या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर मंत्री म्हणून एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांचे छायाचित्र झळकत आहे. या ठिकाणी रोहयो व जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांचेही छायाचित्र आहे. या संकेतस्थळाला आतापर्यंत १० लाख ७ हजार १९० नागरिकांनी भेटी दिल्या असून, या प्रकारामुळे चुकीचा संदेश जात आहे. २६ दिवसांनंतरही शासकीय संकेतस्थळावर मंत्री म्हणून खडसेंचेच छायाचित्र झळकत असल्याचे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा भोंगळ व बेजबाबदार कारभार जनतेपुढे उघड झाला आहे.