शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधीला जवळपास दोन आठवडे उलटल्यानंतरही संबंधित आमदारांकडे कोणतंही खातं दिलं नव्हतं. आज अखेर खातेवाटप झालं आहे. अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडताना अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावर आक्षेप घेतला होता.
अजित पवार निधी देत नाहीत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. असं असूनही आता अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी टोलेबाजी केली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून अर्थखातं अजित पवारांकडे दिलं, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
हेही वाचा- अजित पवारांच्या अडचणी वाढणार? लवासाप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेले होते. त्यांचा अजित पवारांवर आक्षेप होता. अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत, त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय, असा आक्षेप शिंदे गटाच्या आमदारांचा होता. पण आता अजित पवारांकडेच अर्थखातं आलं आहे. मला वाटतं की एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार अजित पवारांवर नाराज होते, या नाराज आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून हे खातं अजित पवारांकडे दिल्याचं दिसतं आहे.”
हेही वाचा- “…राहुल नार्वेकरांनी अपात्रतेसंदर्भात गैरअर्थ काढला”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचं थेट विधान
“आणखी एक गोष्ट म्हणजे, अर्थ खातं सांभाळण्यासाठी अनुभवी माणसाची गरज आहे. कारण परवाच अर्थसंकल्प किंवा अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी अनुभवी आणि जाणकार माणूस पाहिजे. म्हणून कदाचित प्राधान्याने अजित पवारांसारखा अनुभवी आणि अभ्यासू अर्थमंत्री राज्याला मिळावा असावा,” असंही एकनाथ खडसे म्हणाले.