मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीएच्या खासदारांची बैठक पार पाडली. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएच्या खासदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात मोठं विधान केलं. २०१४ साली महाराष्ट्रात शिवसेनेनं युती तोडली होती, भारतीय जनता पार्टीने नाही, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांच्या विधानानंतर भाजपाचे माजी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं विधान पूर्णपणे असत्य आहे. २०१४ साली भाजपा-शिवसेना युती तोडण्याचा निर्णय भाजपाने एकमुखाने घेतला होता, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…हे बच्चू कडूंचं दबावतंत्र असू शकतं”, अनिल देशमुखांचं सूचक विधान
पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले, “२०१४ मध्ये शिवसेनेनं युती तोडली. आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, असं मोदीजी बोलले. पण मोदीजी जे बोलले ते अर्धसत्य आहे. ते अर्धसत्यच नव्हे तर पूर्णपणे असत्य आहे. युती तोडण्याचा निर्णय भाजपाने एकमुखाने घेतला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे युती तुटल्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती. पण शेवटी त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं की, आजपासून आपली युती तुटली.”