कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. असं असतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपा व शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपा आणि शिंदे गटातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. या आरोपांमुळे व्यथित होऊन मी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, असं श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलं आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी मान्य केलं होतं की…”, ‘त्या’ चर्चेबद्दल अमित शाहांचा खुलासा
“जेव्हा एखाद्या खासदाराच्या राजीनाम्यापर्यंत विषय पोहोचतो, तेव्हा सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे, असं काही नसतं. मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात व्हायला लागली असेल, तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल, याचा अंदाज आपण घेऊ शकतो,” असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?
केंद्रात पुन्हा भाजपा-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे, हेच आमचे ध्येय आहे. त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. आमच्या कामांना जर कुणाचा विरोध असेल किंवा कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.