शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले. शिवाय, फक्त शिवसेना हे नावही दोन्ही गटांना वापरता येणार नसल्याने त्यांना नवीन नावं देण्यात आली आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादावर जळगावमधील बोदवड येथील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.

खडसे म्हणाले, “एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली. आपला मित्र पक्ष मजबूत असला तर आपण ही मजबूत असू शकतो. आपल्या महाविकास आघाडी पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. तीन पक्ष मिळून हे सरकार येऊ शकत हे शरद पवारांनी करून दाखवलं होतं. शिंदे सरकार येईल असंही वाटलं नव्हतं. त्यामुळे आपलंही तीन पक्षाचे सरकारी येईल असंही वाटलं नव्हतं. मात्र चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार हे आपल्यामध्ये आहेत. आपलं सरकार राज्यामध्ये येणार तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल.”

याशिवाय “महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपाचा धुवा उडाल्याल्याशिवाय राहणार नाही. घोडा मैदान जवळ आहे, साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते तर आपलाच मुख्यमंत्री झाला असता. आपला पक्ष मजबूत केला पाहिजे आणि तो पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे.” असंही खडसेंनी यावेळी बोलून दाखवलं .

Story img Loader