‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) जळगाव दौऱ्यावर होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कापूस दराच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला. यानंतर आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे.
एकनाथ खडसेंनी मालक बदलला आहे. नवीन मालक जसं सांगतील तसं एकनाथ खडसे वागतात. त्यांनी जमिनीत (भूखंड घोटाळा) काळं तोंड केलं नसतं तर त्यांना नवीन मालकाकडे जाण्याची वेळ आली नसती, अशी टीका फडणवीसांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी मालक बदलला असं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या. तुम्हीही मालक बदलला होता. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लाचार होऊन अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केलं होतं, हा इतिहास पुसता येणार नाही, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात; एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
फडणवीसांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “मी मालक बदलला असं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या. मालक तर तुम्हीही बदलले होते. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी लाचार होऊन तुम्ही अजित पवारांबरोबर गेला होता. हा इतिहास पुसता येणार नाही. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… असं म्हणता म्हणता तुमचा फौजादाराचा हवालदार झाला. तुम्ही हे सत्तेसाठी केलं, मग दुसऱ्यांना दोष का देत आहात.”
हेही वाचा- “एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
“मी काळं तोंड केलं, असं तुम्ही म्हणता. पण तुमच्या मंत्रिमंडळामध्ये निम्म्यापेक्षा जास्त भ्रष्ट लोक आहेत. त्यांच्यावर तुम्हीच आरोप केले होते. असे भ्रष्ट लोक तुम्हाला चालतात का? माझं मागणं साधं आहे, मला तुमच्या अशा भानगडीत पडायचं नाही. मला ‘शासन आपल्या दारी’ यालाही विरोध करायचा नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, कापसाला भाव द्या. आज शासन आपल्या दारी आणि शेतकरी झाला भिकारी, अशी अवस्था आहे. ५० टक्क्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. पेरण्या सुरू व्हायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीला पैसा नाही. त्यांना किमान ६ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं, अशी आमची मागणी आहे,” असंही एकनाथ खडसे म्हणाले.