राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, पण गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, पण गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. जळगावला सध्या जे मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मोक्का संदर्भात जी कारवाई सुरू आहे त्यात अधिक माहिती घेण्यासाठी हे छापे असावेत.”
“जळगावमधील छाप्यांचा आणि माझ्या वक्तव्याचा दुरान्वये देखील संबंध नाही”
“आज जे छापे पडले त्याचा आणि काल मी जे मोक्कासंदर्भात जे म्हटलो त्याचा दुरान्वये देखील संबंध नाही. हा एक योगायोग समजावा,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
“गिरीश महाजन यांना भीतीपोटी तर करोना झाला नाही ना”
दरम्यान, गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी टोला लगावला होता. एकनाथ खडसे म्हणाले होते, “मला करोना झाला तेव्हा ते म्हणायचे ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसेंना दुसऱ्यांदा करोना झाला. मला तर खरंच करोना झाला होता, पण आता गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा करोना झाला. त्यामुळे मला वाटतं त्यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसतंय. त्या भीतीपोटी तर त्यांना करोना झाला नाही ना असा संशय येतोय.”
हेही वाचा : “मी ३ वर्षापूर्वी कुणाला तरी दम भरला आणि …”, गिरीश महाजन यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
“गिरीश महाजन यांना करोना असला तरी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की गिरीश महाजन या करोनातून लवकर बरे होवोत. त्यांची समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून त्यांची प्रकृती, स्वास्थ्य उत्तम रहावं,” अशी प्रार्थना एकनाथ खडसे यांनी केली.