राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा टोला खडसेंनी लगावलाय. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय.
चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?
“राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
नक्की वाचा >> “आंध्र प्रदेशात भाजपाला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्याने…”; वाइन विक्री विरोधावरुन खडसेंचा हल्लाबोल
एकनाथ खडसेंचं उत्तर
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेला भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असा टोला खडसे यांनी लगावलाय.
पुढे बोलताना, “बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे,” असा विश्वासही एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. “सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही,” असं खडसेंनी म्हटलंय.
भुसावळ येथे अनिकेत पाटील मित्रमंडळ व अफ्फन क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत स्व. निखीलभाऊ खडसे स्मृती चषक-२०२२ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी, खासदार रक्षा खडसे, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आधी मान्यवर उपस्थित होते.