एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत राजकारण आणि हेवेदाव्यांना कंटाळून भाजपा सोडत असल्याचं जाहीर केल्यापासून ते आजपर्यंत त्यांच्यात आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छुपा कलगीतुरा सुरूच आहे. एकनाथ खडसे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीसांनी फसवल्याचा, छळ कल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यामुळे या दोन्ही आजी-माजी भाजपा नेत्यांमधला कलगीतुरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे.
“जेव्हा फडणवीस पाचव्या टेबलवर बसायचे…”
देवेंद्र फडणवीसांना राजकीय जीवनात आपली मोलाची मदत झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. “जेव्हा विधानमंडळात फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता. पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेतली”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“फडणवीसांच्या आशीर्वादानेच मला…”
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांचं स्वागतच केलं. पण देवेंद्र फडणवीसांनी माझ्या चौकशा करणं, बदनाम करण्याचा प्रयत्न करणं, अंडरवर्ल्ड डॉनशी माझे संबंध जोडणं, दाऊदच्या बायकोशी माझं संभाषण दाखवणं, माझ्या पीएनं लाच घेतली, मी भूखंडात गैरव्यवहार केला असे खोटे आरोप केले. माझं तिकीट कापलं गेलं, माझी ईडीनं चौकशी केली अशा प्रकारे मला वारंवार छळण्याचा प्रकार यांच्या आशीर्वादाने झालेला दिसतोय”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
“मला हे कळतच नाहीये की…”
“आता एकनाथ खडसे म्हणजे व्यक्तिगत शत्रू आहे अशा रीतीने माझा छळ केला जात आहे, त्याचा मी वारंवार निषेध केला आहे. त्यामुळे मी म्हटलं की दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है.. मला उत्स्फूर्तपणे ते गाणं सुचलं होतं. वारंवार असा छळण्याचा प्रयत्न का केला जातोय, हे माझ्याही लक्षात येत नाहीये”, असं देखील खडसे म्हणाले. “६७ दिवस माझा फोन टॅप केला गेला. विरोधकांचा केला असता तर ठीक आहे म्हटलं असतं. पण निव्वळ मुख्यमंत्रीपदाच्या भीतीमुळे ६७ दिवस माझा फोन टॅप करण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आला”, असा आरोप खडसेंनी केला.
किरीट सोमय्यांना सल्ला
दरम्यान, यावेळी बोलताना खडसेंनी किरीट सोमय्यांना देखील सल्ला दिला आहे. “किरीट सोमय्या गेली ३५ वर्ष एकत्र काम करतोय. काही जात्यात असतात, काही सुपात असतात. सुपातले हसतात, जात्यातले रडतात हा सल्ला मी त्यांना दिला आहे”, असं खडसे म्हणाले.