शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेला लाथ मारली. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेत बाळासाहेबांचा विचार हा दिल्लीचा गुलाम कधीच झालेला नव्हता, असे विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांच्या जागा वाटपाचा निर्णय देखील दिल्लीत घेतला जाणार असून, दिल्लीतील भाजपच्या हाय कमांडच्या मर्जीवर या दोन नेत्यांना अवलंबून राहावे लागत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. धुले जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “मला सत्तेचा मोह कधीच नव्हता, मी केवळ…”, एकनाथ शिंदेंनी सांगितली मनातली खदखद

२२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद झालेल्या सर्वच स्तरातील हुतात्म्यांना अभिवादन करणार असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर येथे दर्शनानंतर गोदातीरावर महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

त्या लोकांना पक्षात घेणार नाही

“आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात पुन्हा घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका राऊत यांनी व्यक्त केली. पक्षातून सोडून गेलेल्या लोकांना आम्ही उमेदवारी दिल्याचा पश्चाताप होत असल्याची खंतही राऊत यांनी बोलताना व्यक्त केली.

आणखी वाचा >> काँग्रेसला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा हव्यात? संजय राऊत म्हणाले, “आम्ही आधीच सांगितलंय…”

जागावाटपाबाबत बोलत असताना संजय राऊत यांनी आपल्या जुन्या भूमिकेलाच पुन्हा मांडले. आकडा वाढवायचा म्हणून आम्ही निवडणुका लढणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीतर्फे घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जवळपास २३ जागांवर शिवसेना ही कायम लढत आली असून २३ मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम आहे. परंतु जिंकलेल्या १८ जागा आमच्या कायम राहतील, असा विश्वास देखील राऊत यांनी धुळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल, असे वक्तव्य केले होते. यावर बोलत असताना राऊत म्हणाले की, या भूकंपात तेच गाडले जातील, अशा शब्दात गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde and ajit pawar faction lok sabha candidates will decide from delhi says sanjay raut rno news kvg