Lok Sabha Election Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती सध्या आहे. १२ ते १५ मार्च या कालावधीत या तारखा जाहीर होण्याची चिन्हं आहेत. अशात जागावाटपाच्या दृष्टीने महायुती काय करणार? याचे विविध अंदाज लावले जात आहेत. सध्या सरकारमध्ये असलेल्या महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. भाजपा ४८ पैकी ३२ जागा लढवणार आणि उरलेल्या जागा मित्रपक्षांना म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रात चर्चा
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपा ३२ जागांवर ठाम आहे अशी एक चर्चा बाहेर आली होती. ३२ जागांवर भाजपा लोकसभा लढणार असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटासाठी ८-८ म्हणजेच सिंगल डिजिट जागा उरतात. अशा चर्चा रंगल्या होत्या. तसंच अशीही एक माहिती सूत्रांनी दिली होती की एकनाथ शिंदे १३ जागांवर ठाम आहेत. नेमकी चर्चा काय झाली? जागावाटपाचं काय ठरलं तो तपशील बाहेर आलेला नाही. मात्र ज्या चर्चा रंगत आहेत त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
“लोकसभेच्या निवडणुका आहेत, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल? आम्ही काय करायचं आहे? अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात प्रत्येक राज्याच्या कोअर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राची चर्चा आम्ही करण्यासाठी आलो आहोत. भाजपाने जी पहिली यादी आणली त्यात भाजपा जिथे लढणार आहे ती माहिती आली आहे. बाकी सगळी माहिती तुम्हाला मिळेलच. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सिंगल डिजिटच्या प्रश्नावर काय दिलं उत्तर?
“एक डिजिट मिळणार, अर्धेच मिळणार ही सगळी पतंगबाजी आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान देऊ. सन्मानाप्रमाणे जागा आम्ही देऊ. त्यामुळे जे काही पतंगबाजी करणं चाललं आहे एवढ्याच जागा आणि तेवढ्याच जागा मिळणार अशा बातम्यांना अर्थ नाही.” असं म्हणत मित्र पक्षांना सिंगल डिजिट मिळण्याच्या चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सिंगल डिजिटच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.