सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत असं म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करुन काहीही उपयोग नाही. अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे अजिबात राजीनामा देणार नाहीत. कुणी मनातही आणू नये की हे राजीनामा देतील. स्वप्नात राजीनामा देणार नाही तर प्रत्यक्षात तर विचारच सोडा. असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, “प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.”
मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकासआघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.