“एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे म्हणजे गारद्यांची टोळी, वसुली करायला…” उद्धव ठाकरेंची टोलेबाजआज आपल्या सभेला शिवसैनिकांची गर्दी झाली आहे आणि मुंबईच्या एका कोपऱ्यात गारदी जमले आहेत. गारदी शब्दाचा अर्थ माहित आहे का? गारदी म्हटल्यावर राघोबादादा, नारायणराव सगळे आठवतात. गारदी शब्दाचा अर्थ असा आहे की पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करण्यासाठी अशा काही गारद्यांची टोळी तिकडे जमली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
मी माझ्या भाषणात म्हटलं की माननीय पंतप्रधान मोदी अमेरिकेला चालले आहेत पण मणिपूरला गेले नाहीत. मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे म्हटल्यावर नवे गुलाम चिडले. लाचार मिंधे त्यांनी सांगितलं की सूर्यावर थुंकू नका. कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरु सूर्य असेल तर मग तो मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे सूर्य उगवणार नसेल तर करायचं काय? प्रत्येक वेळी संजय राऊतनेच प्रतिक्रिया द्यायला हवी असं काही नाही. मणिपूरमध्ये मी जे बोललो तिथेच राहणारे रिटायर्ड ले.जन. निशिकांत सिंग. त्यांनी ट्विट करुन मणिपूर हे स्टेटलेस स्टेट म्हणजेच तिथे कायद्याचं राज्य संपून तिथे सीरियासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे. सीरिया, लिबिया, नामिबिया असं म्हटलं आहे. जनता पिसाळल्यावर काय होतं याची उदाहरणं त्यांनी दिली आहे.
लिबियामध्ये गडाफी होता. तो हुकूमशाह होता. जनता पेटल्यावर तो पळाला आणि कुठे सापडला तुम्हाला आठवतोय? गटाराच्या पाईपमध्ये लपला होता. मग बंडखोरांनी त्याचे केस धरुन त्याला बाहेर खेचला आणि हाल हाल करुन आणि तुडवून मारला. अशी परिस्थिती सिंग यांनी सांगितली आहे. डबल इंजिन सरकार नुसतं वाफा सोडतंय पुढे जातच नाही. डबल इंजिन सरकार तिकडे कोसळलंय, घसरलंय. अमित शाह म्हणजे एक इंजिन जाऊन आलं दुसरं जातंच नाही. लिबियासारखी परिस्थिती म्हणजे भाजपाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत, घरं जाळली जात आहेत. तसं बघायला गेलं तर भाजपावाले मार खात आहेत, आम्हाला आनंद व्हायला हवा. पण भाजपावाले असले तरीही त्यांच्यासह असं होऊ नये हे आम्हाला वाटतं आहे कारण हे आमचं हिंदुत्व आहे.
मी आत्ता हास्यजत्रेच्या कलाकारांना भेटलो त्यांना मी म्हटलं की तुम्ही आम्हाला हसवलंत चांगलं केलं. आमची हास्यजत्रा सुरुच असते. कालच हास्यजत्रेचा एक प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी सादर केला. एवढंच बोलल्यावर तुम्ही हसता आहात. त्यांचा प्रयोग सांगितल्यावर किती हसाल असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर कोव्हिडची व्हॅक्सिन मोदीजींनी तयार केली हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य त्यांनी दाखवलं. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे माहित नाही. कोव्हिडची लस मोदीजींनी तयार केली मग बाकीचे संशोधक काय गवत उपटत होते का? असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. असे अंधभक्त आणि त्यांचे गुरु म्हटल्यावर त्यांना व्हॅक्सिन द्यायची गरज आहे.
मला वाटतं की या सगळ्यांना समुपदेशनासाठी समीर चौगुलेंच्या केंद्रात पाठवलं पाहिजे कारण सगळे अवली आहेत. लवली कुणीच नाही असं म्हणत भाजपाला टोला लगावला. तुम्ही अवली असलात तरीही जनता कावली आहेत. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.