एकीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आरोप होत आहे की, सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटलं आहे की, शिंदे फडणवीस सरकारचं काउंटडाऊन सुरू आहे.

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. परंतु साधारण ९ ते १० महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिवसेनेचे गटनेते (तत्कालीन) आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी केली, तसेच शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन ते राज्याबाहेर पडले. या ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि काही दिवसांनी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली.

दरम्यान, आता राज्याच्या राजकारणात पुन्हा बदल पाहायला मिळेल, असा सूर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठा दावा केला होता. शिंदे-फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरू झाला असल्याचं वक्तव्य मिटकरी यांनी केलं होतं.

आमदार मिटकरींनी आज एक ट्वीट करून मोठी खळबळ उडवली आहे. मिटकरी यांनी म्हटलं आहे की, “भाजपाकडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झाला आहे हे आता एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलंय. अशी माहिती मला शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राने दिली आहे.”

हे ही वाचा >> पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

“शिंदे फडणवीस सरकारचं काउंटडाऊन सुरू”

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता की, राष्ट्रवादीवर जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल बदलापुरात बोलताना मिटकरी यांनी या दाव्याला दुजोरा दिला. मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय, परंतु त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट त्यांचंच काऊंटडाऊन सुरू झालं आहे.