Political Holi 2025 : राज्याच्या विविध भागात होळी उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. आज (१४ मार्च) धूलिवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बुरा न मानो होली है!’, असं म्हणत होळीचं सेलिब्रेशन केलं जातं. आता होळी सणाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील नेते एकमेकांना शुभेच्छा देतानाही पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देत खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील विरोधकांवर टीका केली आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना शुभेच्छा देत आमचा रंग भगवा आहे, ज्यांना भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्याबरोबर यावं, असं म्हटलं आहे. दरम्यान, होळीच्या शुभेच्छा देतानाही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची राजकीय धुळवड पाहायला मिळाली आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“राजकारणात कोणता रंग गडद करायचा? हे फक्त राज्यातील आणि देशातील जनतेच्या हातात आहे. कोणता रंग गडद करणं? कोणता रंग फिकट करणं हे सर्व जनतेच्या हातात आहे. आपण पाहिलं असेल की राज्यात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जनतेनं शिक्कामोर्तब केलं की राज्यात फक्त आणि फक्त भगवा रंगच गडद होऊ शकतो. तसेच जो रंग भगव्याच्या विरोधात आहे, काही लोकांनी भगव्यावर हिरवा रंग लावला. लोकांना सांगायला भगवा, पण आत हिरवा. अशा लोकांना जनतेने नाकारलं”, असं म्हणत भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी आमच्या बरोबर यावं. भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. भगवा रंग हा वैश्विक आहे. भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे. भगवा रंग हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारा आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगात न्हावून निघावं त्यांनी आमच्या बरोबर यावं, अशा शुभेच्छा देतो”, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर खोचक टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की आमचा रंग हा तिरंगा आहे, जो भारताचा रंग आहे, तो आमचा रंग आहे.”

बावनकुळे काय म्हणाले?

“नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालण्यासाठी होळीच्या निमित्ताने नाना पटोलेंनी संकल्प करावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा”, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील चांगले प्रश्न मांडले पाहिजेत. आम्ही जो काही संकल्पनामा दिला, तो संकल्पनामा पुढे नेण्यासाठी आम्हाला विजय वडेट्टीवारांनी आम्हाला सातत्याने आठवण करून दिली पाहिजे. तसेच त्यांचा काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. तसेच काँग्रेसमध्ये जे काही मनभेद आणि मदभेत आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न देखील वडेट्टीवारांनी केला पाहिजे, याच त्यांना शुभेच्छा”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्यांनी दररोज सभागृहात यावं. सभागृहात येऊन राज्य सरकारला चांगल्या गोष्टी सांगाव्यात. कारण उद्धव ठाकरे हे फक्त कधीतरीच सभागृहात येतात”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे.