उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसेच हा अर्थसंकल्प अभ्यासपूर्ण असल्याचं मत मांडलं. शिंदे म्हणाले की, “राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प बनवला आहे. अर्थमंत्री फडणवीस यांनी विकासाचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आहे.”
शिंदे म्हणाले की, “हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठांसह सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. आपलं हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक ऐतिहासिक योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. राज्यातल्या आत्महत्या थांबवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्य सरकारने मुलींसाठी ‘लेक लाडकी’ ही योजना आणली आहे. अशी योजना आपल्या राज्यात पहिल्यांदाच सादर करण्यात आली आहे. तसेच २.५ ते ३ कोटी असंघटित कामगारांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. असंघटित कामगारांच्या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी गरजेची पावलं उचलली जातील. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना रोजगार मिळवून दिले जातील, तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना असतील. तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.”
हे ही वाचा >> फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला
विकासाचा मेगाब्लॉक दूर होईल : शिंदे
एकनाथ शिंदे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काही ठप्प होतं त्याला चालना देण्याचं काम नव्या सरकारने आणि आमच्या अर्थसंकल्पाने केलं आहे. आपल्या राज्यात विकासाचा मेगाब्लॉक तयार झाला होता, फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तो दूर केला आहे. याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील.”