शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोठे आहेत, याबाबत काल दिवसभर खलबतं चालली होती. मात्र आता शिंदे हे गुजरातमध्येच होते, हेस्पष्ट झाले असून सध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचा आकडादेखील समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तसेच अपक्ष सात आमदारांना सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत.
आज मध्यरात्रीच शिवसेना आमदारांना सुरतमधील हॉटेलमधून एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात असे एकूण ४० आमदार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या चर्चेनंतरही एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना गुजरातमधील सुरतहून थेट आसामधील गुवाहाटी येथे घेऊन गेल्यामुळे शिंदे- ठाकरे यांची चर्चा निष्फळ ठरल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
बच्चू कडूदेखील शिंदे यांच्यासोबत?
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सात अपक्ष आमदार आहेत. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचादेखील समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असा विश्वास बच्चू कडू यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केलेला आहे. मात्र राज्यमंत्री असूनदेखील ते बंडखोर आमदारांमध्ये सामील झाल्याचे म्हटले जात आहे.