Eknath Shinde : प्रयागराज या ठिकाणी भरवण्यात आलेल्या महाकुंभमेळ्याची सांगता नुकतीच झाली. २६ फेब्रुवारीला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटची तिथी होती. यानंतर कुंभमेळ्याची सांगता झाली. या कुंभमेळ्याला महिन्याभराच्या कालावधीत कोट्यवधी लोकांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रयागराज या ठिकाणी जाऊन स्नान केलं. आता एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी का आलात नाहीत असा सवाल केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. जर ते हिंदू आहेत तर मग ते कुंभमेळ्यात स्नान करायला का गेले नाहीत? या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. कुंभमेळ्यात ६५ कोटींहून अधिक लोकांनी स्नान केलं. डुबकी मारली आणि आपल्या श्रद्धा जपल्या. मग राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी कुंभमेळ्यात येणं का पसंत केलं नाही?”असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून बुधवारी टीका करण्यात आली होती. दरम्यान अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना उत्तर देत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की मी कामांतून उत्तर देत असतो. आज त्यांना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी कुंभमेळ्याला न गेल्यावरुन त्यांच्यावर टीका केली.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंगही आक्रमक

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनीही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे वीर सावरकरांचा विरोध आणि निषेध नोंदवणाऱ्या राहुल गांधींना साथ देत आहेत. तसंच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात दिशा भरकटलेले लोक आहेत. अशीही बोचरी टीका सिंग यांनी केली होती.

काँग्रेस नेते अजय राय यांनी काय म्हटलं आहे?

काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की कुंभमेळा आता संपला आहे. जे लोक कुंभमेळ्यात आले त्यांचा सन्मान वाटतो. मात्र हा सगळा विषय श्रद्धेचा आहे. मी देखील कुंभमेळ्यात गेलो होतो आणि पवित्र स्नान केलं. मी काँग्रेस परिवार आणि गांधी परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी गेलो होतो. देशाचं हित व्हावं म्हणून मी प्रार्थना केली. महाकुंभमेळा हा धार्मिक विषय आहे. त्यात कुठलंही राजकारण आणता कामा नये.

महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता

महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता झाली. बुधवारी कुंभमेळा संपला. संपूर्ण ३० ते ३१ दिवसांच्या कालावाधीत देशभरातल्या ६५ कोटी लोकांनी महाकुंभमेळ्यात स्नान केलं.

Story img Loader