मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेसाटी गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे देऊन बोलावण्यात आले, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेआधी येथील जनतेची भेट घेतली. याच भेटसत्रादरम्यान एक अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी पेढेतुला नाकारताच तेथे ठेवलेल्या पेढ्यांवर लोक तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी ११० किलो लाडू आणि १०० किलो पेढे अवघ्या एका मिनिटात गायब केले. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठण येथे शिंदे यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी बिडकीन येथे मुख्यमंत्र्यांची पेढेतुला आयोजित करण्यात आली होती. मात्र ही पेढेतुला एकनाथ शिंदे यांनी नाकारली. त्यानंतर पेढेतुलेसाठी आणलेले पेढे पळवण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्वागत समारंभाकडे शिंदे यांनी पाठ फिरवताच जमलेल्या गर्दीने लाडू आणि पेढे पळवले. अवघ्या एका मिनिटात १०० किलो पेढे तसेच ११० किलो लाडू जमलेल्या गर्दीने पळवले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांची पेढेतुला करण्यात आली होते. त्यावेळीही असाच प्रकार पाहायला मिळाला होता.
हेही वाचा >> आधी पुत्र अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग, आता पिता राज ठाकरेंचे गणेशोत्सवावर थेट भाष्य; म्हणाले…
सभेला गर्दी व्हावी म्हणून पैसे वाटले?
मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून संदीपान भुमरे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सभेला जमण्यासाठी लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव टाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. तर हा आरोप भुमरे यांनी फेटाळून लावला असून ही ऑडिओ क्लीप विरोधकांनीच बनवली असा आरोप भुमरे यांनी केला आहे.