Eknath Shinde on Guardian Ministers Appointment Postpone Supports Bharat Gogawale & Dada Bhuse : शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने दोघेही नाराज आहेत. दरम्यान, गोगावले व भुसे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती. पाठोपाठ भरत गोगावले यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोकोसारखी आंदोलनं सुरू केली. या गोंधळात नवा ट्विस्ट आला असून राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा यासंबंधीचं पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. यावरून सरकारच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.
“नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल”, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा असून या नाराजीमुळेच ते साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी गेल्याचं बोललं जात आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “मी माझ्या गावी आलो की माझ्या नाराजीची चर्चा सुरू करतात. मात्र, मी इथल्या विकासकामांसाठी गावी आलो आहे”. तसेच भरत गोगावले व दादा भुसे यांची पालकमंत्रिपदाची मागणी व नाराजीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, “पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं असं काहीच नाही”.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले, “नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) काहीही काळजी करू नका. तुम्हाला चिंता आहेत, मात्र या सर्व चिंता व प्रश्न लगेच सुटतात. आम्हाला काहीच अडचण येत नाही. त्यातच आता नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावर स्थगिती दिली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल”.
“पालकमंत्रिपदाची मागणी करण्यात वावगं काय?” एकनाथ शिंदेंचा प्रश्न
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला की महायुतीत सर्वकाही आलबेल आहे का? त्यावर शिंदे म्हणाले, “तुम्हाला असा प्रश्न का पडतो? निवडणुकीपासून तुम्हाला असे प्रश्न सातत्याने पडत आले आहेत. तिकीटवाटपापासून ते आतापर्यंत सगळे प्रश्न सुटत गेले आहेत. मंत्रिमंडळाचा व आता पालकमंत्रिपदाचा प्रश्न देखील जवळपास सोडवला आहे. भरत गोगावले यांनी नाराजी स्पष्ट केली असली तरी पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय? त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रायगडमध्ये काम केलं आहे. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवून मागणी करण्यात काही चुकीचं नाही. महायुतीमध्ये मी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आम्ही तिघे बसून, यावर चर्चा करून मार्ग काढू.