Eknath Shinde on Maharashtra New Chief Minister : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे श्रेष्ठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेला

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला. मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. कारण त्यांचं पाठबळ लाभलं. या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत. पत्रकार असोत, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे. असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलेलं नाही-एकनाथ शिंदे

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची ( Eknath Shinde ) अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदावरून माघार घेण्यापूर्वी पंतप्रधानांशी काय बोलणं झालं? एकनाथ शिंदेंनी प्रत्येक शब्द सांगितला

लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख कुठल्याही पदापेक्षा मोठी-शिंदे

आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झालं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखलं. मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, रडणारे नाही तर लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde big statement about cm post and ladki bahin scheme what did he say scj