Eknath Shinde Reaction after Oath Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी तीनही नेत्यांनी शपथविधीनंतर पहिल्या तासातच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शपथविधीला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच देशभरातील इतर मान्यवर शपथविधीला आले, त्याबद्दलही आभार व्यक्त केले. तसेच मी पूर्वी सीएम अर्थात ‘कॉमन मॅन’ होतो, आता मी डीसीएम झालो आहे. अर्थात आता मी ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ झालो असल्याची मिश्किल प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षांचाही आढावा घेतला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी मुख्यमंत्री असताना मला चांगले सहकार्य केले. आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव माझ्यासाठी कामी आला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी याआधीही फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देईल, असे मी जाहीर केले होते”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
गृहमंत्रीपदाबाबत भाष्य
गृहमंत्रीपदावरून नाराज होता का? असा प्रश्न विचारला तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या नाराजीच्या बातम्या खोट्या होत्या. मी गावी गेलो, आजारी पडलो तरी तुम्ही नाराजीच्या बातम्या चालवता, असे टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याबाबतही त्यांनी भाष्य मांडले. आम्ही आताच मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू ठेवण्यास सांगितले आहे.
श्रीकांत शिंदेंच्या बातम्या निराधार
श्रीकांत शिंदे मंत्रिपद घेणार असल्याबाबतही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, श्रीकांत शिंदे केंद्रात खासदार आहे. तो उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिपद घेणार नाही. गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत शिंदेंच्या ज्या बातम्या चालविल्या गेल्या, त्या आता थांबवा, असे आवाहन त्यांनी केले.