मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती ही भाजपाला मिळाल्याचे दिसत आहे. भाजपाकडे महसूल, गृह विभाग, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर शिंदे गटाकडे पाणीपुरवठा व स्वच्छता बंदरे व खनिकर्म, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग अशी खाती आहेत. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले मंत्री संजय राठोड आणि टीईटी घोटाळ्यामध्ये मुलींची नावे आलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडेदेखील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सत्तार आणि संजय राठोड यांना मिळाली महत्त्वाची जबाबदारी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा एक दिवस अगोदर अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात आली होती. यामध्ये सत्तार यांच्या मुलींचे टीईटी पात्र प्रमापत्रदेखील रद्द करण्यात आले होते. या आरोपानंतर सत्तार यांना मंत्रिपद मिळणार का असे विचारले जात होते. मात्र त्यांना ऐनवेळी मंत्रीपद देण्यात आले. तर दुसरीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनादेखील मंत्रीपद दिल्यामुळे शिंदे-भाजपा सरकारवर जोरदार टीका केली गेली. या दोन्ही नेत्यांवरील आरोपानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आज शिंदे सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाले असून अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. तर संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील –
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार-
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील-
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित-
आदिवासी विकास
गिरीष महाजन-
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण</p>
गुलाबराव पाटील-
पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे-
बंदरे व खनिकर्म
संजय राठोड-
अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे-
कामगार
संदीपान भुमरे-
रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत-
उद्योग
प्रा.तानाजी सावंत-
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण –
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार-
कृषी
दीपक केसरकर-
शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे-
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई-
राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा-
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास