शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षावरच दावा करण्यात आला आहे. हा सर्व वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला तीन पर्यायी चिन्हांची यादी दिली होती. ही चिन्ह शिवसेनेकडून निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आली. मात्र, आज ( १० ऑक्टोबर ) शिंदे गटानेही यातील दोन चिन्हांची तर एका नावाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेकडून रविवारी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हाचा तर, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे, अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर सोमवारी शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची तर, शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गट ठाकरेंची कोंडी करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह परत कधी मिळणार? आगामी महानगरपालिका निवडणुकाही नव्या चिन्हावरच?

शिवसेना दिल्ली उच्च न्यायालयात

दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमचू बाजू मांडण्याची आणि प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यास तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे.