संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे.
“लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. चित्रा वाघ यांना माहिती नसावं. त्यांना कागदपत्रं पाठवण्याची व्यवस्था करु. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास असल्याने मी आतापर्यंत शांत होतो. सर्व सत्य बाहेर आलं आहे. मी नको ते भोगलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, माझाही परिवार आहे, पत्नी आहे, मलाही मुलंबाळ आहेत, वयस्कर आई-वडील आहेत. एखाद्याला किती त्रास होतो याचा आपणही विचार केला पाहिजे. मी चार वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. तसं असतं तर जनतेने मला निवडून दिलं नसतं”, असं संजय राठोड म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असंच सुरु राहिलं तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार,” असा इशारा संजय राठोड यांनी यावेळी दिला.
पाहा व्हिडीओ –
“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या
“माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी दाखल झालेली याचिका पुणे कोर्टाने दोन वेळा फेटाळून लावली होती. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणतीही तक्रार नाही. तरीही आरोप झाले म्हणून चौकशी करण्यात आली. त्यानतंर मी मंत्रीपदावरुन बाजूला झालो होते. याप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी झाली आहे,” असा त्यांचा दावा आहे.
“लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण आपण काय बोलत आहोत याचं भान हवं. मीदेखील जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे यापुढे कोणी काही बोललं तर मी कायदेशीर कारवाई करणार”, असं ते म्हणाले.