विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल (शुक्रवार, ४ ऑगस्ट) संपलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी तुफान फटकेबाजी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, वर्षभर ते आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणून हिणवत होते, परंतु, याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हे पाहिलं पाहिजे.” त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाने ५० कोटी रुपये मागितल्याचं पत्रदेखील दाखवलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही संयम बाळगतो, याचा अर्थ आम्हाला काही माहिती नाही, असं समजू नये. हे आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करतात. रोज आम्हाला शिव्या श्राप देतात. दुसरीकडे आमच्याकडचे ५० कोटी रुपये द्या, म्हणून पत्र पाठवतात. त्यामुळे खरे खोकेबाजे आणि गद्दार कोण?” दरम्यान, हे वक्तव्य करत असताना ठाकरे गटाने पाठवलेलं ‘आमचे ५० कोटी रुपये द्या’ अशा आशयाचं पत्र एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दाखवलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, शिवसेनेशी, शिवसैनिकांशी काही देणंघेणं नाही. फक्त ५० खोक्यांवर त्यांचा डोळा आहे. याचा इतर लोकांनी विचार करावा,” एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, ते पैसे शिवसेनेचे असतील आणि शिवसेनेने मागितले तर त्यात पाप काय आहे? त्यात काही चुकीचं आहे का? ते पैसे काय त्यांचे (शिंदे गटाचे) होणार आहेत का? ते पैसे आमच्या पक्षाचे होते. आमच्या पक्षाला दिले होते आम्ही ते परत मागितले तर त्यात कसलं पाप?