निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याच प्रकरणावर आता न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना पक्षाच्या संपत्तीवर तसेच बँक खात्यावरही दावा सांगणार का? असा प्रश्न विचारला जात होता. याच प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केले आहे. आम्ही शिवसेना पक्षाच्या संपत्तीवर दावा सांगणार नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ते ‘एबीपी’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर रोहित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “बेरोजगारी, शेतकरी…”
बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच सर्वात मोठी संपत्ती
“आम्हाला शिवसेना हे पक्षनाव मिळाले धनुष्यबाण मिळाले. त्यानंतर लोक म्हणत आहेत की आम्ही त्यांची संपत्तीही घेऊ. मात्र आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला काहीही नको. आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही. भविष्यातही आम्ही त्यावर दावा करणार नाही. आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच सर्वात मोठी संपत्ती आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षाच्या बँक खात्यावर दावा सांगणार नाही
“एकनाथ शिंदेने कधीही काहीही घेतलेलं नाही. आतापर्यंत मी फक्त देत आलो आहे. मी देणारा आहे. घेणारा नाही. आम्ही शिवसेना पक्षाच्या बँक खात्यावर दावा सांगणार नाहीत. आम्हाला ते बँक खाते नको आहे,” असे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा >>> ‘पक्ष चोरला, गद्दारी केली,’ उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचे थेट भाष्य; म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे…”
त्याच सरकारची आम्ही आता स्थापना केली
“आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच पुरेसे आहेत. आम्ही त्यांच्या विचारधारेवरच जात आहोत. सरळ सरळ बाब आहे की २०१९ साली जे भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले नव्हते. त्याच सरकारची आम्ही आता स्थापना केली आहे,” असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.