अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात असल्याचे विरोधकांकडून सातत्याने सांगण्यात येतंय. तसंच, येत्या काळात महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री पाहायला मिळतील, असा ठाम दावाही ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी खुलासा केला आहे.
“जनतेमध्ये संभ्रम राहू नये म्हणून, म्हणून ही पत्रकार परिषद घेतोय. १२ महिन्यांपूर्वी जो उठाव झाला तो कोणत्या पक्षातून झाला हे सर्वांना माहितेय. ज्या पक्षात उठाव झाला, तिथे परत जाण्याचा प्रश्न येत नाही. किंवा ते आमच्याकडे येण्याचाही प्रश्न येत नाही. आज महायुती २०० पेक्षा जास्त आमदार घेऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार देत असेल तर भविष्यात एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाखाली आमदार खासदारकीच्या निवडणुका होणार आहेत, हे ठामपणाने सांगितलं पाहिजे”, असं उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा >> ‘अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गट नाराज झालाय का?’, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“काही लोक ज्या पद्धतीने राजकारण करत होते, राजकारण करताना वैयक्तिक टीका करायचे, शिवीगाळ करायचे. अनेक कार्यक्रम आपण पाहिले, त्यामध्ये एकमेव कार्यक्रम एकनाथ शिंदे यांची बदनामी करणे, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका हाच होता. अपक्ष आमदारांवर टीका केली गेली. सरकार पाडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. पण सरकार स्थिर आहे”, असंही उदय सामंत म्हणाले.
“अजित दादा महायुतीत घटकपक्ष म्हणून सामील झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला जाणार आहे हे पेरलं जातं, पसरवलं जातं. जाणीवपूर्वक निगेटिव्हिटी निर्माण केली जाते. त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
बावनकुळे काय म्हणाले होते?
“अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार म्हणून विरोधी पक्षातील काही नेते संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमच्यामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही फूट पाडली नाही. आम्हाला कोणाचा पक्ष फोडण्यात काही रस नाही. आमच्या पक्षात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विरोधी पक्षातून आम्ही सत्तेत आलो. फडणवीस एक पाऊल मागे आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले”, असे बावनकुळे म्हणाले.