महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाने धक्कातंत्र सुरुच ठेवत बंडखोर शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करुन बंडखोर शिवसेना आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसून बाहेरुन सरकारच्या कामावर लक्ष ठेऊ असं फडणवीस यांनी म्हटलंय. मात्र या निर्णयामुळे आता फडणवीस महाविकास आघाडीमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्याप्रमाणे बाहेरुन सक्रीय होते तशाच भूमिकेत असणार का अशी चर्चा सुरु झालीय. असा थेट प्रश्न एका पत्रकाराने माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना आज राजभवनाबाहेर पत्रकार परिषदेनंतर विचारला. त्यावर महाजन यांनी स्पष्टपणे उत्तर देतानाच फडणवीस केंद्रात जाणार का याबद्दलही प्रतिक्रिया नोंदवलीय.
नक्की वाचा >> “मी सरकारच्या बाहेर राहून…”; एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री असल्याच जाहीर करताना देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
“तुमचे जे माजी मंत्री होते ते एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करायला तयार आहेत का?,” असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “एकनाथ शिंदे आणि आम्ही मागील ३० वर्षांपासून एकत्रच काम करतोय. इथं पद खाली आहे की वर किंवा ज्येष्ठ आहे की श्रेष्ठ आहे हा प्रश्न नाहीय. मुख्यमंत्री ते होत असतील तर आमचं मंत्रीमंडळ एकत्र राहील आणि आम्ही त्यांच्या अंतर्गत एकत्रित काम करु,” असं सांगितलं.
तसेच पुढे बोलताना महाजन यांनी, “नियोजन करुन घेतलेला हा निर्णय आहे. आमच्याकडे संख्याबळ असलं तरी ते आम्ही खुर्चीसाठी किंवा मुख्यमंत्री पदासाठी वापरलं नाहीय. गेल्या अडीच वर्षामध्ये या सरकारने जो गोंधळ राज्यात घातला होता त्यामुळे सर्वसामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, नोकरदार असेल सर्वजण त्रासलेले होते. त्यासाठी हा निर्णय घेतलाय. भाजपा संपूर्णपणे एकनाथ शिंदेंसोबत आहे,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “त्यांचे ४२ ते ५० जण आहेत आणि आम्ही १२० आहोत. हा काही एका दुसऱ्याच निर्णय नाही सर्वांचा मिळून निर्णय आहे. आम्हाला हा निर्णय नंतर कळाला पक्ष श्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय आहे,” असं महाजन यांनी सांगितलं.
“देवेंद्र फडणवीसांची भूमिका शरद पवारांच्या भूमिकेसारखी असणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर गिरीश महाजन यांनी, “पक्षश्रेष्ठी विचार करतील तसं असेल. सध्या ते मार्गदर्शन करतील आणि सरकारवर लक्ष ठेवतील,” असं सांगितलं.
तसेच मुख्यमंत्री पद का सोडलं यासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी, “राज्याचा विचार करुन पद सोडलं. विकासाठी पद सोडलं,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे, “देवेंद्रजी केंद्रात जाणार का?” या प्रश्नावर, ” राज्याला मार्गदर्शनाची गरज, आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुढे जाणार,” असं उत्तर देत थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.