राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांना अर्थखातं देण्याला शिंदे गटाने विरोध केला. तसेच आधीप्रमाणेच ते निधीबाबत भेदभाव करतील, अशी शंका व्यक्त केली. यानंतरही अजित पवारांकडेच अर्थखातं आलं. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या चर्चांवर भाष्य केलं. ते शनिवारी (१५ जुलै) नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी सांगितलं आहे की, त्यांना सगळे लोक दबंग म्हणतात. ते कडक असल्याचं बोलतात. ते रेटून नेतात, असं म्हणतात. मात्र, तसं नाही. ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. आमच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेईल, असं अजित पवारांनी सांगितलं.”

“एकही आमदारावर अन्याय होऊ देणार नाही”

“मीही सांगतो की, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याबरोबरच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्याबरोबरच्या २०० पेक्षा अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. कुणालाही खालची, वरची वागणूक देणार नाही. सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे सरकार करेल,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा…”, अजित पवारांचं वक्तव्य

“देशाची मोट बांधायला निघालेल्यांचीच बोटं फुटली”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “विरोधी पक्ष वज्रमुठ करत होते. त्यांची वज्रमुठ तर वज्रझुठ ठरली. तसेच या देशाची मोट बांधायला निघालेल्यांची स्वतःचीच बोटं फुटून गेली. त्यांच्यात काहीच राहिलं नाही. त्यामुळे हे सगळे पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले, तरी एक नेता ठरवू शकत नाही. यातच मोदींचा विजय निश्चित झाला आहे.”

हेही वाचा : अर्थखातं मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न, आता काय? अजित पवार म्हणाले…

“जेवढे आरोप केले तेवढ्या विरोधकांच्या जागा कमी झाल्या”

“याआधीही २०१४, २१०९ मध्ये अनेक आरोप झाले, आघाड्या झाल्या, मात्र त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ मध्ये तर विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी जेवढी संख्या लागते त्यापेक्षा खाली गेले,” असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde comment on ajit pawar partiality in front of devendra fadnavis pbs
Show comments