मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या जिवाला धोका असूनही झेड सुरक्षा नाकारल्याचा गंभीर आरोप झालाय. एकनाथ शिंदे यांना तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारल्याचा आरोप तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई व बंडखोर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलाय. याबाबत एकनाथ शिंदे यांनाच पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (२३ जुलै) मुंबईत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “सुहास कांदे यांनी जे भाष्य केलं त्यावर तत्कालीन गृहराज्यमंत्री संभुराज देसाई यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय. मी गेली काही वर्षे पालकमंत्री म्हणून काम करत होतो. तेथे आपल्या पोलिसांनी नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली होती. सी ६० जवानांनी २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. गडचिरोलीत नक्षलवाद कमी करणं, त्या भागाचा विकास करणं आणि उद्योग सुरू करणं हा माझा उद्देश होता.”
“या देशातील नक्षलवाद्यांनी मला धमकीचं पत्र दिलं”
“गडचिरोलीच्या विकासासाठी आम्ही सुरजागड प्रकल्प सुरू केला. त्यात नक्षलवाद्यांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. परंतू पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि २७ नक्षल मारले गेले. त्यामुळे त्या पोलिसांचाही मी सन्मान केला आणि ५१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्यामुळे या देशातील नक्षलवाद्यांनी मला धमकीचं पत्र दिलं, धमक्याही आल्या,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“मी अशा धमक्यांना भीक घातली नाही”
“मला यापूर्वी देखील अशा धमक्या आल्या होत्या. त्याचा माझ्यावर परिणाम झाला नाही. मी अशा धमक्यांना भीक घातली नाही आणि घालणारही नाही. त्यामुळे पोलिसांच्या समितीने मला झेड सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. ती बैठक शंभुराजे देसाई यांनी घेतली होती. याबाबत शंभुराजे देसाईंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
शंभुराजे देसाई काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवास नक्षलवाद्यांकडून धोका असल्याचा अहवाल प्राप्त झालेला होता. त्यासाठी त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची गृहमंत्रालयाची तयारी असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना अशी सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या वेळी त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या जिवास नक्षलवाद्यांकडून धोका होता. माओवादी संघटनांकडून एकनाथ शिंदे यांच्या जिवास धोका होता असं पत्र शिंदे यांना आलं होतं. त्यांनी ते पत्र गृह खात्याकडे आणि माझ्याकडे सोपविले होते. आमच्या विभागाने त्याची चौकशी केली. माझ्या दालनात त्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था यांनीही शिंदे यांना संरक्षण पुरविण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर विधान परिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर उत्तर देताना मी पत्राबाबतची सुरू असलेल्या चौकशी बाबतची माहिती सभागृहात दिली. त्याच वेळी मी सभागृहास या पत्राबाबत सत्यता आढळली तर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं.
याबाबतची गृह खात्याने शहानिशा केल्यानंतर शिंदे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु हा निर्णय मंजुरीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला दूरध्वनी करत शिंदे यांना अशी सुरक्षा देण्यास विरोध दर्शवल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला. पुढे महाविकास आघाडी सरकार जाईपर्यंत हा निर्णय झालाच नाही. शिंदे यांना सुरक्षा पुरविण्याच्या नकारामागचे काय कारण हे उद्धव ठाकरेच सांगू शकतील असेही देसाईंनी या वेळी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबतची माहिती मी त्या वेळी देत सावधानता घेण्याचे आवाहन केले. परंतु त्यांनी मला सुरक्षेची गरज नसून मला फक्त काम करण्यात रस असल्याचे सांगितल्याचे देसाई यांनी सांगितले.