मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात, असं सांगितलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “संदीपान भुमरेंनी सांगितलं की, मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो म्हणून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला. मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही.”

“आमदारांना मी नेलं नाही, त्यांनी मला नेलं”

“संदीपान भुमरेदेखील तसेच आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, कधी आले ते मी सांगत नाही. शहाजीबापू म्हणाले आम्ही सगळे एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, तर आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तूस्थिती आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“…तर पुढच्या निवडणुकीत हाताच्या बोटाएवढेही आमदार येणार नाहीत”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा अन्याय झाला, मुस्कटदाबी झाली, तेव्हा संदीपान भुमरे आले आणि म्हणाले काय करायचं? मी म्हटलं काय करायचं, चाललंय ते चालू द्या. ते म्हणाले असंच चाललं तर पुढच्या निवडणुकीत हाताच्या बोटाएवढेही आमदार येणार नाहीत. मी म्हटलं मी ठीक आहे, मला काहीच अडचण नाही. त्यावर म्हणाले, तुम्हाला अडचण नाही, पण सर्व आमदारांना अडचण आहे, जनतेला अडचण आहे.”

हेही वाचा : “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही आणि मंत्रालयात…”, अजित पवारांचा हल्लाबोल

“मला तेव्हा वाटलेलं की संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का?”

“मला तेव्हा वाटलेलं की संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का, पण मी पाहिलं जबरदस्त धाडसी माणूस निघाला. दिलेला शब्द पाळणारा माणूस निघाला. लढाई तशी सोपी नव्हती. तुम्ही सगळे टीव्ही चॅनलवर बघत होता. काय होईल, काय होईल, काय होईल? अशी स्थिती होती. सगळेजण आपला कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. सगळ्यांनीच आपला कार्यक्रम करायचं ठरवलं होतं, परंतु माझ्याबरोबर असणारे ५० लोक त्यांना पुरून उरले,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde comment on his politics commitment and promises in paithan aurangabad pbs