शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. येथे रश्मी ठाकरे यांनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रश्मी ठाकरेंनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. दरम्यान, रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो. रश्मी ठाकरे यांनीही दर्शन घेतले असेल, तर चांगली गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार
“देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही. दर्शन सर्वांनीच घेतले पाहिजे. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले असेल तर चांगलीच बाब आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असून या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
हेही वाचा >>> बाळासाहेब, वाघ, शिवसेनेसह धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सगळी चित्रे झळकली
तसेच, त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिली. संजय राऊत हे कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला.