शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गुवाहाटीमधील हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे समर्थक गटाचे दावे फेटाळले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसेच इथं ५० लोक असून सर्व आनंदी असल्याचंही नमूद केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “दीपक केसरकर आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. ते माध्यमांना वेळोवेळी माहिती देतील. गुवाहटीमधील सर्व आमदार अगदी आनंदात आहेत. बाहेरून काही लोक गुवाहाटीतील आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी कोणते आमदार संपर्कात आहेत ती नावं सांगावी. त्यानंतरच यावर स्पष्टता येईल.”
“गुवाहाटीत ५० लोक आहेत आणि ते स्वतःच्या मर्जीने आले आहेत”
“समोरचे लोक खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. इथं ५० लोक आहेत. स्वतःच्या मर्जीने आले आहेत. ते खूश आहेत, आनंदी आहेत. आम्ही एक भूमिका घेऊन आलो आहोत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…
“कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थासाठी इथं ४०-५० लोक आले नाहीत. हिंदुत्वाची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका घेऊन हे लोक इथं आले आहेत. पुढील माहिती दीपक केसरकर देतील,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.