मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. आता निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गट चोर आहे, अशी टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांनी माझ्या वडिलांचा वारसा चोरला, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाते. यावरच आता एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले आहे. ते ‘एबीपी’ या वृत्तवाहिनीवर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सोनिया गांधी खरंच संन्यास घेणार? दिग्विजय सिंह यांनी केलं स्पष्ट; म्हणाले….

गद्दार आहे, चोर आहे असे म्हणणे सोपे आहे

“शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला आहे. या पक्षात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. आज १३ खासदार, ५० आमदार, हजारो कार्यकर्ते, अनेक नगरसेवक माझ्यासोबत का आले? यावर विचार करणे गरजेचे आहे. आरोप करणे सोपे आहे. गद्दार आहे, चोर आहे असे म्हणणे सोपे आहे,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले.

पक्षाचे प्रमुखच बाळासाहेबांच्या विचारांना विकत असतील तर काय करावे?

“आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं होतं. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम केलेले आहे. आमच्या पक्षाचे प्रमुखच बाळासाहेबांच्या विचारांना विकत असतील तर काय करावे?” असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.

जो निर्णय आहे, तो आम्ही स्वीकारतो- एकनाथ शिंदे

“मी कशाचाही ताबा घेत नाही. मी फक्त काम करतो. लोकशाहीत बहुमताला फार महत्त्व असते. सध्या राज्यात बहुमताचे सरकार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत केले आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यांचे स्वत:चे काही अधिकार असतात. आपल्या बाजूने निर्णय आला तर न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग चांगले आहेत. विरोधात निकाल लागला तर या स्वायत्त व्यवस्था चांगल्या नाहीत, असा आरोप केला जातो. आम्ही मात्र असा कोणताही आरोप करत नाही. जो निर्णय आहे, तो आम्ही स्वीकारतो,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.