राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंयात निवडणुकांचा निकाल शुक्रवारी (५ ऑगस्ट) जाहीर झाला. यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला अनेक ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलीही तयार केलेली नसतानाही शिवसेना-भाजपा युतीला चांगलं यश मिळालं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते मुंबईत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कोणतीही पूर्वतयारी केलेली नसताना शिवसेना-भाजपा युतीला खूप चांगलं यश मिळालं आहे. विजयी झालेल्या उमेदवारांचं, निवडणुकीत मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं मी अभिनंदन करतो.”
“एमएमआरडीएच्या माध्यमातून घरं बांधण्यात येतील”
“पाटणमध्ये गेल्यावर्षी दरड कोसळून ज्यांच्या घरांचं नुकसान झालं अशी ५५० लोक होते. त्या सर्वांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर होता. म्हणून पुनर्वसनासाठी जागा विकत घेण्यासाठी निधी देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. तेथे एमएमआरडीएच्या माध्यमातून घरं बांधण्यात येतील,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
“जागा ताब्यात घेतल्यानंतर तातडीने युद्धपातळीवर घरं बांधली जातील आणि ५५० लोकांना हक्काची घरं दिली जातील,” असंही शिंदेंनी नमूद केलं.